‘स्मार्ट प्रीपेड मीटर घेणार नाही’, मोफत वीजपुरवठ्याची मागणी
हरिभाऊ लाखे
नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवात अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून केले जात असताना, नाशिकमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरद्वारे तात्पुरती वीज जोडणी घेण्यास गणेश मंडळांनी कडाडून विरोध केला आहे. अशा जोडणीसाठी पूर्वी भरलेली अनामत रक्कम १० वर्षांत परत मिळालेली नाही. माफक दरात वीज मिळेल, असे सांगून नंतर वाणिज्यिक दराने देयके दिली जातात. त्यामुळे आता महापालिकेच्या धर्तीवर महावितरणने गणेश मंडळांना वीज बिल माफ करावे, अशी मागणी पुढे आली आहे. गणेश मंडळांच्या भूमिकेला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पाठिंबा देत, आम्ही मीटर घेणार नसल्याचे सूचित केले.
मंगळवारी भद्रकाली पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळे आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांना घ्यावी लागणारी तात्पुरती वीज जोडणी आणि स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या विषयावर चर्चा झाली. महावितरणने यापूर्वीच गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच उत्सव कालावधीत केवळ अधिकृत वीज जोडणीच (वीज कनेक्शन) घ्यावी, असे आवाहन केले आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता कोणत्याही मंडळाने अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये, मंडप उभारताना पुरेशी काळजी घ्यावी, असेही महावितरणने म्हटले आहे. तात्पुरत्या वीज जोडणीसाठी मंडळांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत.
गणेश मंडळांनी महावितरणकडून तात्पुरती वीज जोडणी आणि स्मार्ट प्रीपेड मीटर घेण्यास नकार दिल्याचे बैठकीत समोर आले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत निषेध केला. गणेशोत्सवात आम्ही अर्ज केल्यानंतर महावितरण मंडळांना २० ते २५ हजार रुपये अनामत रक्कम ऑनलाइन भरायला लावते. मीटर घेऊन आलेला ठेकेदार पुन्हा तीन ते पाच हजार रुपये उकळून विलंबाने मीटर बसवतो. शासन गणेशोत्सवासाठी घरगुती तीन रुपये प्रति युनिट दर जाहीर करते; मात्र महावितरण वाणिज्यिक म्हणजे १५ रुपये प्रति युनिट दराने देयक पाठवते. भरलेली अनामत रक्कमही लवकर मिळत नाही. अनेक मंडळांचे पैसे महावितरणकडे अडकून पडले आहेत. या स्थितीत यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळे तात्पुरती वीज जोडणी घेणार नसल्याची भूमिका शेट्ये यांनी मांडली.
गणेश मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरातून वीज घेतील. मात्र, महावितरणचे स्मार्ट प्रीपेड मीटर किंवा जोडणी घेणार नसल्याचे शेट्ये यांच्यासह अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मनसेचे अंकुश पवार यांनी सर्व गणेश मंडळांना मोफत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. कोणतेही मंडळ वीजचोरी करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
