अनिल ठाणेकर
ठाणे : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य केला जाणार नाही. रिंग मेट्रोमुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, अशा पर्यायी मार्गांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काही मोजक्या हितसंबंधांसाठी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची घाई करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिंग मेट्रो प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि बाधित नागरिकांचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाहीही सरनाईक यांनी दिली. तसेच लोकमान्यनगरातील रहिवाशांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसून, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीला जितेंद्रकुमार इंदिसे (आरपीआय एकतावादी), जयेंद्र दरेकर (उपशहरप्रमुख, शिवसेना), रामचंद्र गुरव, राजीव शिरोडकर, भालचंद्र देसाई, प्रदीप चव्हाण (भाजप), सागर भोसले (मनसे), बालेश हत्तीआंबीरे (राष्ट्रवादी काँग्रेस—शरदचंद्र पवार पक्ष), मल्हारी सावरे, शीतल संतोष ढमाले (नगरसेविका) आणि राकेश शिंदे (नगरसेवक) यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिंग मेट्रोसाठी लोकमान्यनगरातील हजारो घरे बाधित झाल्यास पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. काही बिल्डरांच्या कथित हितासाठी लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न आहे का, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
विभागप्रमुख संतोष ढमाले यांनी लोकमान्यनगरच्या विनाशावर विकासाची इमारत उभी करू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवून कोणताही प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाल्यास जनतेचा रोष रस्त्यावर दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, काही विघ्नसंतोषी व्यक्ती स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरून रिंग मेट्रोला समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगरसेवक राकेश शिंदे यांनी केला. अशा भूलथापांना लोकमान्यनगरची जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्याचा विकास हवा; मात्र लोकमान्यनगरच्या विनाशाच्या किमतीवर नाही. नागरिकांचे हित, बाधितांचे योग्य व १०० टक्के पुनर्वसन आणि पर्यायी मार्गांचा विचार केल्याशिवाय रिंग मेट्रो प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली.
