ठाणे : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नागरिकांनी रिंग मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाला तीव्र विरोध दर्शवत पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी केली.

या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य केला जाणार नाही. रिंग मेट्रोमुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, अशा पर्यायी मार्गांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काही मोजक्या हितसंबंधांसाठी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची घाई करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि बाधित नागरिकांचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्प लादला जाणार नाही,” अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली. तसेच लोकमान्यनगरातील रहिवाशांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगत, “मी स्वतः आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक तोडगा काढतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत नागरिकांनी आपल्या अडचणी, भीती आणि भविष्यातील संभाव्य संकटांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. मेट्रो प्रकल्प ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असला, तरी त्यासाठी लोकमान्यनगराला किंमत मोजावी लागणार असेल, तर प्रकल्पाच्या नियोजनावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याची भूमिका नागरिकांनी मांडली. हजारो घरे बाधित झाल्यास पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, काही बिल्डरांच्या कथित हितासाठी लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न आहे का, असा संतप्त सवालही बैठकीत उपस्थित करण्यात आला. “लोकमान्यनगरच्या विनाशावर विकासाची इमारत उभी करू देणार नाही,” असा निर्धार विभागप्रमुख संतोष ढमाले यांनी व्यक्त केला. काही स्वार्थी आणि आपमतलबी लोकांच्या मनमानीला लोकमान्यनगरवासीय भीक घालणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाल्यास जनतेचा रोष रस्त्यावर दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे यांनीही रिंग मेट्रोला समर्थन मिळविण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांकडून नेत्यांचे फोटो वापरून व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचा आरोप केला. अशा भूलथापांना लोकमान्यनगरची जनता बळी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला जितेंद्रकुमार इंदिसे (आरपीआय एकतावादी), जयेंद्र दरेकर (उपशहरप्रमुख, शिवसेना), रामचंद्र गुरव (विभागप्रमुख), राजीव शिरोडकर (विभागप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), भालचंद्र देसाई (विभागप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), प्रदीप चव्हाण (भाजप), सागर भोसले (मनसे), बालेश हत्तीआंबीरे (राष्ट्रवादी काँग्रेस—शरदचंद्र पवार पक्ष), मल्हारी सावरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), शीतल संतोष ढमाले (नगरसेविका) आणि राकेश शिंदे (नगरसेवक) यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ठाण्याचा विकास हवा; मात्र लोकमान्य नगरच्या विनाशाच्या किमतीवर नाही. नागरिकांचे हित, बाधितांचे योग्य व १०० टक्के पुनर्वसन आणि पर्यायी मार्गांचा गांभीर्याने विचार केल्याशिवाय रिंग मेट्रो प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *