– दहा गावांतील सुमारे ३०० शेतकरी सभेत सहभागी; ३० सप्टेंबरला मोर्चाचा निर्णय
अनिल ठाणेकर
ठाणे, सरळगाव एमआयडीसी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बाधित दहा गावांतील शेतकऱ्यांची प्राथमिक सभा रविवारी पारतळे येथे उत्साहात पार पडली. या सभेला परिसरातील सुमारे ३०० शेतकरी उपस्थित होते. “एमआयडीसी नको” अशी ठाम भूमिका घेत प्रकल्पाविरोधात अखेरपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते करण्यात आला.
या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सभेतील बहुतांश उपस्थिती स्थानिक शेतकऱ्यांची होती. परिसराबाहेरील पाहुणे म्हणून केवळ काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख आणि शाई धरण संघर्ष समितीचे प्रशांत सरखोत उपस्थित होते. याशिवाय कोणत्याही बाहेरील नेत्याचे नेतृत्व या सभेला नव्हते.
सभेत उपस्थित शेतकऱ्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. सरळगाव एमआयडीसी प्रकल्पामुळे शेतजमीन, शेतीवर आधारित उपजीविका आणि स्थानिकांच्या भवितव्यावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. एमआयडीसी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नको आणि त्यासाठी शेवटपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष केला जाईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली.
यावेळी ७/१२ उताऱ्यावर करण्यात आलेला भूसंपादनाचा शेरा काढण्यात यावा, ही प्रमुख मागणी पुढे आली. या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याची सूचना करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी ही सूचना एकमताने मान्य केली. त्यानुसार येत्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. मोर्चाच्या माध्यमातून शासन व प्रशासनापुढे “७/१२ वरील भूसंपादनाचा शेरा काढलाच पाहिजे” आणि “सरळगाव एमआयडीसी प्रकल्प नको” या मागण्या ठामपणे मांडण्यात येणार आहेत.
