पुणे : महाराष्ट्र राज्य औद्यौगिक विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या रतन टाटा उद्योग भूषण पुरस्कारासाठी उद्योगपती बाळासाहेब गुंजाळ यांची निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार येत्या ११ सप्टेंबर रोजी टाटा ऑटो क्लस्टर चिंचवड येथील सभागृहात देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य औद्यौगिक विकास परिषद, पुणेचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि याच संस्थेचे मुख्य विश्वस्त आणि टाटा मोटर्स लिमिटेडचे सल्लागार मनोहर पारळकर यांनी दिली. बाळासाहेब देवराम गुंजाळ हे ज्योती हीटसिंक्स अँड एन्क्लोजर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते मुळचे आळे ता.जुन्नर येथील आहेत.
आपण उद्योग क्षेत्रात करीत असलेले योगदान आम्हास अंत्यत महत्वपूर्ण, उल्लेखनीय, प्रेरणादायी वाटलेले आहे.आपले विचार आणि आपली कार्यक्षमता ही उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या विचारांकडे घेऊन जाणारी वाटल्यामुळे आपली या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे,असे महाराष्ट्र राज्य औद्यौगिक विकास परिषद, पुणे या संस्थेने बाळासाहेब गुंजाळ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेले आहे. बाळासाहेब हे काही उच्च विद्याविभूषित नाहीत.ते अल्पशिक्षित मॅट्रीक दहावी आहेत.परंतु अनुभवाच्या जोरावर त्यांनी एखाद्या उच्च शिक्षित तरुणालाही लाजवेल अशी त्यांनी आपल्या उद्योगाची उभारणी केलेली आहे.त्यांच्या कंपनीचे मुख्य युनिट पुणे भोसरी येथे असून चाकण येथे तिसरे युनिट सुरु करुन चौथ्या युनिटची उभारणी तेथे सुरु आहे.ते एक प्रयोगशिल उद्योगपती आहेत. जानेवारी २००० मध्ये त्यांनी आपली कंपनी सुरु केली.सध्या ही कंपनी ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक, टेलिकॉम आय टी, डिफेन्स, रेल्वे, इलेक्ट्रिक वाहने, अणु उर्जा क्षेत्रासाठी लागणारे उपकरणे व हिटसिंक बनवण्याचे काम करत आहेत. सध्या कंपनीच्या तीन युनिटमध्ये ९० कामगार कामगार आहेत.
