संपदा सावंत
मुंबई : अन्यायाविरोधात आवाज उठवत स्वतःच्या आयुष्याची सूत्रे हाती घेणाऱ्या सहा वेगवेगळ्या स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ हा चित्रपट २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला. खासदार सुनेत्रा अजित पवार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही करण्यात आला.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या व्यक्तिरेखांची झलक पाहायला मिळते. या सहा स्त्रियांची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याचा समान धागा त्यांच्या कथांना जोडतो.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने बंडखोर होत्या. ‘बंडखोर’मधील या सहा स्त्रिया अनेक महिलांना प्रेरणा देतील.” तर सुनील गावस्कर यांनी आपल्या आयुष्यातील बंडखोर स्त्री म्हणून आईचा उल्लेख करताना, “क्रिकेट हे सुरक्षित करिअर नसताना माझ्या आईनेच मला प्रोत्साहन दिले,” असे सांगितले.
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “अन्यायाविरोधात आवाज उठवणारी स्त्री म्हणजे बंडखोर. माझी मोठी मुलगी हीच या चित्रपटाची प्रेरणा आहे. मला घडवणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हा चित्रपट आदरांजली आहे.”
संजय शेटये यांच्या विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाला सिद्धार्थ साळवी आणि इरावती कर्णिक यांचे संवाद लाभले आहेत. स्त्रीच्या संघर्षासोबतच तिच्या आत्मनिर्भरतेची आणि बंडखोर वृत्तीची कथा मांडणारा हा चित्रपट २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
००००
