– स्थानिक आमदार निलेश राणे यांचे कुडाळवासियांनी मानले आभार…!

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत आणि पर्यटन विभागामार्फत साकारण्यात आलेल्या ‘गणेश घाट’ तसेच परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा कुडाळ-मालवण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात पार पडला. आगामी गणेशोत्सवाच्या  पार्श्वभूमीवर  या भव्य गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात आले.  कुडाळ शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन विकासात मोलाची भर घालणारा हा प्रकल्प भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळेच हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.

गणेशोत्सवादरम्यान भाविकांची सुरक्षा ही नगरपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर, मोठ्या व वजनी मूर्तींच्या सुलभ विसर्जनासाठी विशेष ट्रॉलीची व्यवस्था केली जाणार असून, सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथक देखील तैनात असणार आहे. याप्रसंगी त्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या श्रेयवादाच्या मुद्यावर  उत्तर देताना आमदार  राणे म्हणाले, “कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी निर्णय (जीआर) आणि निविदा प्रक्रिया महत्त्वाची असते. गणेश घाट कामाचा जीआर २२ जून २०२५ रोजी निघाला, १ सप्टेंबर २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध झाली आणि २९ ऑक्टोबर २०२५ रोजी भूमिपूजन झाले. सर्व प्रशासकीय मंजुऱ्या व ऑर्डर्स माझ्याच कार्यकाळात निघाल्या असून, आम्ही पुराव्यानिशी काम करून दाखवतो.”

माजी आमदारांवर टीका करताना आमदार राणे म्हणाले, “माजी आमदारांची भूमिका ही केवळ प्रतिशोध घेणाऱ्या ‘शकुनी मामा ‘सारखी आहे. या नकारात्मक भूमिकेमुळेच महाभारतातील कौरवांचा नाश झाला. आम्ही दोनदा पराभूत झालो तरी कधीही बदल्याचे राजकारण केले नाही. कुडाळच्या विकासात कोणतीही नकारात्मकता आड येऊ देणार नाही. केवळ मंत्र्यांसमोर हात बांधून उभे राहण्यापेक्षा जनतेच्या हक्काचा निधी कसा आणायचा, हे आम्ही दाखवून दिले आहे.” शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जि.प.चे उपाध्यक्ष दादा साईल यांचीही यावेळी भाषणे झाली. या गणेश घाटाच्या बांधकामासोबतच परिसराचे सुशोभीकरण केल्याने कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यास मदत होणार आहे. नदीकाठच्या परिसरात स्वच्छ सुंदर व रमणीय वातावरण निर्माण करणे हा या प्रकल्पा मागचा उद्देश आहे.

00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *