३४ पेट्रोल कार्डचे वितरण
अनिल ठाणेकर
ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत प्राप्त झालेल्या ३४ पेट्रोल कार्डचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते ८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका सह जिल्हा मुख्यालयातील रुग्णवाहिकेसाठी ही पेट्रोल कार्ड वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या पेट्रोल कार्डच्या माध्यमातून संबंधित रुग्णवाहिकांना एचपी पेट्रोल पंपावर कार्डचा वापर करून आवश्यक इंधन भरता येणार आहे. पेट्रोल कार्डच्या खात्यामध्ये दररोज नियोजित रक्कम जमा केली जाणार असल्याने रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेतील अडचणी दूर होऊन इंधन उपलब्धतेत सातत्य राहण्यास मदत होणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अन्य शासकीय आरोग्य संस्थांमध्ये तातडीने स्थलांतरित करण्यासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होऊन रुग्णवाहिका सेवा अधिक कार्यक्षम आणि अखंडितपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रुग्णवाहिकांसाठी पेट्रोल कार्डची सुविधा उपलब्ध झाल्याने या सेवेला अधिक बळ मिळणार आहे.
