आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
अनिल ठाणेकर
ठाणे : गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, कचरा संकलन, ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार वृक्षांच्या फांद्यांची छाटणी यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण संवर्धन, वायू प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता व्यवस्थापन आणि महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यापक कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त, सहायक आयुक्त, उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना विनाविलंब परवानगी देण्यासोबतच शहरातील सर्व रस्ते स्वच्छ राहतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सणांच्या काळात विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले. बांधकामस्थळी टायर वॉशिंगची सुविधा, नियमित पाणी फवारणी, हिरव्या जाळ्यांचा वापर तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची सातत्याने तपासणी करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाला देण्यात आल्या.
बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तातडीने विल्हेवाट लावावी, तसेच प्रभागांमध्ये घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले. स्वच्छता अभियानात स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला.
वृक्ष प्राधिकरण, उद्यान आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे काम करून वृक्षसंवर्धन, हरित क्षेत्रवाढ आणि खुल्या जागांचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, असे आयुक्तांनी सांगितले. घोडबंदर रोडवरील मेट्रो प्रकल्पाच्या कामातून निर्माण होणारा डेब्रीज आणि वापरात नसलेली यंत्रसामग्री रस्त्यालगत पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी विकासकांवर नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, एसआरए, एमआयडीसी आदी महसुली स्रोतांमधून उत्पन्न वाढविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *