हरिभाऊ लाखे
नाशिक : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना जाहीर झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या नवचेतना अभियान आणि पोषणदूत या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
समाजातील सर्वात दुर्बल घटकांची ओळख करून त्यांच्यापर्यंत विद्यमान शासकीय योजना व सेवांचा प्रभावी समन्वय साधत प्रत्यक्ष परिणाम घडवून आणणे, हे या उपक्रमांचे वैशिष्ट्य आहे. नवीन योजना निर्माण करण्याऐवजी उपलब्ध शासकीय यंत्रणा, निधी आणि योजनांचा एकत्रित वापर करून गरजू लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमांची आखणी करण्यात आली.
नवचेतना अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करून १,०६,००० महिलांची माहिती संकलित, वर्गीकृत व मॅप करण्यात आली. या महिलांच्या गरजेनुसार त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांशी जोडण्यात आले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३७ बचत गट क्लस्टर्सना शून्य व्याजदराने एकूण १.१८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनासाठी तीन मोफत व जातिनिरपेक्ष वधू-वर परिचय मेळावे आयोजित करण्यात आले, त्यातून सात पुनर्विवाह देखील संपन्न झाले आहेत. विधवांच्या सन्मानासाठी सौभाग्य शपथपत्र या उपक्रमातून ९१५ ग्रामपंचायतींनी विधवांबाबत असणाऱ्या असामाजिक प्रथा बंद करण्याबाबत ठराव केले आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची उच्च शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात आली. ३२२ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले असून बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून १५,००६ बालकांना दरमहा २,२५० रुपये सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *