५०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, परवान्याशिवाय सुरू होती विक्री
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत सुमारे ५०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले. सांगली येथून डोंबिवलीत आणलेल्या दुधाची तपासणी केली असता त्यामध्ये भेसळ आढळून आली. तसेच संबंधित व्यक्तीकडे दूध विक्रीसाठी आवश्यक परवानाही नसल्याचे तपासात समोर आले.
एफडीएचे अधिकारी राजेंद्र कर्डक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भेसळयुक्त दूध कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध डेअऱ्यांच्या माध्यमातून विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर विभागाच्या पथकाने कारवाई करत सुमारे ५०० लिटर दूध नष्ट केले. भेसळयुक्त दूध नेमके कोणत्या स्वरूपाचे होते, त्याचा पुरवठा कोणत्या डेअऱ्यांना करण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
0000000
