– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीl
ठाणे : उत्सव साजरे करण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतानाच नागरिकांच्या आरोग्याच्या किंमतीवर मोठ्या आवाजात डॉल्बी-डीजे वाजविणे आणि धोकादायक उच्च-तीव्रतेच्या लेझर लाईट्सचा वापर होऊ नये, यासाठी ठाणे जिल्ह्यातही डॉल्बी व धोकादायक लेझर लाईट्सवर कठोर बंदी अथवा निर्बंध लागू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहरच्या शिष्टमंडळाने ठाणे निवासी जिल्हाधिकारी (प्रांत) संदीप माने यांच्याकडे केली. यावेळी कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते, किशोर भोईर, ठाणे नगर विभाग कार्यवाह दर्शना ढोले, कळवा विभाग कार्यवाह प्रमोद तामसे, प्राचार्य जयकुमार घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. ठाणे जिल्हा हा विविध धर्म, पंथ, जाती, भाषा आणि संस्कृतींच्या नागरिकांचा जिल्हा असून येथे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद, मोहरम, ख्रिसमस, गुरुपौर्णिमा, विविध जयंती-मिरवणुका तसेच सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र, उत्सवाचा आनंद हा अन्य नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका ठरू नये, अशी भूमिका महा. अंनिसने मांडली.
मोठ्या आवाजातील डॉल्बी-डीजे साऊंडमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होण्याबरोबरच झोपेचा अभाव, मानसिक ताण, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित धोके वाढू शकतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, हृदयविकाराचे रुग्ण, विद्यार्थी तसेच रुग्णालयातील रुग्णांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली ध्वनीमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
उत्सव आणि मिरवणुकांमध्ये वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उच्च-तीव्रतेच्या लेझर लाईट्समुळे डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः लेझर किरण थेट डोळ्यांवर पडल्यास रेटिनाला इजा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या डोळ्यांच्या दिशेने अथवा आकाशाकडे प्रक्षेपित होणाऱ्या धोकादायक लेझर बीमवर बंदी घालावी, अशी मागणी समितीने केली.
महा. अंनिसने स्पष्ट केले की, ही मागणी कोणत्याही एका धर्माच्या किंवा उत्सवाच्या विरोधात नाही. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद, मोहरम, ख्रिसमस किंवा कोणतीही जयंती-मिरवणूक—ध्वनिप्रदूषणाचे नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी भूमिका समितीने घेतली. धर्म, जात, पंथ किंवा राजकीय प्रभाव न पाहता कायद्याची समान अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. प्रत्येक मोठ्या उत्सवासाठी स्वतंत्र Noise Monitoring Squad नियुक्त करावी, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त पथकांमार्फत ध्वनीची तपासणी करावी, तसेच ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या आयोजकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि शांतता क्षेत्रांमध्ये विशेष ध्वनी नियंत्रण व्यवस्था करावी. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन किंवा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करून तक्रार मिळाल्यानंतर तातडीने ध्वनीमापन व कारवाई करावी. तसेच उत्सव काळात ध्वनीची डिजिटल मॉनिटरिंग व्यवस्था उभारून त्याची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
“उत्सव साजरा करा; पण दुसऱ्याच्या आरोग्याची किंमत देऊन नाही,” या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात डॉल्बी-डीजे आणि धोकादायक लेझर लाईट्सवर कठोर नियंत्रण आणून सर्वधर्मीय समान धोरण लागू करावे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने संबंधित विभागांची बैठक घेऊन जिल्हास्तरीय कृती आराखडा जाहीर करावा, अशी नम्र परंतु ठाम मागणी महा. अंनिस ठाणे शहरच्या शिष्टमंडळाने केली.शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांच्याकडे निवेदन सादर करून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *