लोकसभेतील पराभवाने घाबरून महायुती सरकारचा अर्थसंकल्पात ‘मोफत’ योजनांचा पाऊस.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार किती घाबरले आहे याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्र सरकारने सादर केलेला २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणे बाकी आहे, मात्र आज विधानसभेत घोषणा आणि जुमल्यांचा पाऊस पडला आहे. पावसाळा फक्त ३ महिन्यांचा असतो, त्यानंतर वारे बदलतातच आणि काळ्या ढगांप्रमाणे या सरकारला जनता नक्कीच हवेत दूरवर भिरकावून देईल. महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक यांच्या जुमल्यांना आणि थापांना बळी पडणार नाहीत असा हल्लाबोल करत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पुन्हा बहुमत मिळेल आणि जनतेचा खरा विकास आम्हीच करू असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारच्या बजेटवर प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील ‘जुमलेबाज’ महायुती सरकार लोकसभा निवडणुकीतील एवढे घाबरले आहे की बिल्डर आणि ठेकेदार मित्रांच्या हितासाठी सातत्याने काम करणाऱ्या भ्रष्ट सरकारला अखेर जनतेची आठवण झाली व मोफत देऊ नका म्हणणा-यांनीच मोफतचा पाऊस पाडला. काँग्रेसच्या न्याय गॅरेंटी ला घेऊन नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी किती प्रभावित झाले आहेत, हे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून दिसून येते. महालक्ष्मी नारी न्याय योजनेतून चोरी करून, महाराष्ट्र सरकारने २१-६० वर्षे वयोगटातील ‘पात्र’ महिलांना दरमहा १५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ही बाब वेगळी की, त्यांनी पात्रतेचे निकष अजून स्पष्ट केलेले नाहीत. काँग्रेसने लोकसभेच्या जाहीरनाम्यात प्रत्येक गरीब घरातील एका बहिणीला दरमहा ८,५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे सुशिक्षित तरुणांसाठी ‘पहिली नोकरी पक्की’ या काँग्रेच्या योजनेपासून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र सरकारनेही एप्रेंटिसशिप योजना जाहीर केली, परंतु अर्जदारांच्या संख्येवर नियंत्रण आणले आहे.
मुख्य म्हणजे ‘फेक नैरेटिव’ रचून तो विकण्यात या सरकारचा हात कोणी धरू शकत नाही. मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले जाईल, असा नारा आहे. पण सत्य हे आहे की, ही योजना फक्त OBC आणि EWS कुटुंबातील मुलींसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. महायुती सरकारच्या ‘चुनावी’ आणि फसव्या अर्थसंकल्पाला जनता बळी पडणार नाही. महाराष्ट्रात परिवर्तन होणारच असून ठोकशाही हरेल आणि महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वासही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
00000