नवी मुंबई : नवी मुंबईचे स्वच्छ शहर मानांकन उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छता मोहीमा राबविण्यावर व त्यामध्ये लोकसहभाग घेण्यावर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशनने जाहीर केलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानाच्या अनुषंगाने सगळीकडे नागरिकांच्या सहभागातून विशेष स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत.
यामध्ये रेल्वे स्टेशन व परिसराची स्वच्छता हा एक मोठा घटक असून याठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असल्याने येथील स्वच्छतेची जबाबदारी सिडको प्राधिकरणाची असली तरी शहर स्वच्छतेसाठी अत्यंत सक्रिय असणारी नवी मुंबई महानगरपालिका स्टेशन्स परिसराच्या स्वच्छतेविषयी जागरूक आहे.
या अनुषंगाने आज वाशी रेल्वे स्टेशन परिसर येथे सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) राबविण्यात आली. यामध्ये अति. आयुक्त श्री. सुनिल पवार सक्रिय सहभागी होते. त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे, स्वच्छता अधिकारी श्री. सुर्यकांत म्हात्रे तसेच वाशी विभागातील अधिकारी-कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिका व सिडको महामंडळाचे स्वच्छतामित्र यांच्यासह टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी आणि नागरिक उत्साहाने सहभागी झाले.
या विशेष सखोल स्वच्छता मोहीमेत 95 जणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत वाशी रेल्वे स्टेशन परिसराच्या स्वच्छतेत आपले योगदान दिले तसेच माझी वसुंधरा अभियानाची व कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंधासह स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
0000