ज्ञानेश्वर पाटील यांना मिळालेली रयत शिक्षण संस्थेचे कुबेर ही उपमा कौतुकास्पद
राज भंडारी
पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज या विद्यालयात वरिष्ठ लेखनिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ दि. २७ मार्च रोजी जासई येथे संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या जासई विद्यालयात त्यांना विद्यालयाच्यावतीने सर्व सेवकांकडून सपत्नीक सन्मान करण्यात आला.
सायंकाळी त्यांच्या कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्र मंडळींकडून घरगुती सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक नेते दा.चां.कडू गुरुजी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी याठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवापूर्तीतील ३६ वर्षे त्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थितांसमोर कथित करण्यात आली. शिक्षक नेते दा.चां.कडू यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आदी बाबी निदर्शनास आणताना नात्यापेक्षा आपल्या बरोबर त्यांनी जपलेले स्नेहसंबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ असल्याचे गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती भावूक झाले होते. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेच्या घडामोडी कथन केला.
यावेळी दा.चां.कडू गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवेतील अनेक ठिकाणांच्या शैक्षणिक सेवांना उजाळा दिला. ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर पाटील यांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्थेला जासई शाळेसाठी एक एकर जागा बक्षीस रूपाने दिली होती. ज्ञानेश्वर पाटील हे बीएससी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने एक एकर जागेची जाणीव ठेवत ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिक्षणाची दखल घेवून त्यांना आपल्या शिक्षण संस्थेत रुजू करून घेतले. सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि प्रामाणिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांना संस्थेने सहाय्यक लेखनिक पदाची जबाबदारी सोपविली.
सुरुवातीला उरण तालुक्यातील गव्हाण येथील शाळेत सेवा दिल्यानंतर त्यांची पोलादपूर तालुक्यातील तुर्भे आणि नंतर पैठण याठिकाणी बदली झाली. त्यानंतर महाड तालुक्यातील विन्हेरे येथे देखील त्यांनी सेवा केली. नंतर मात्र संस्थेने त्यांना त्यांच्या घराजवळ पनवेल तालुक्यातील रिटघर नंतर दापोली – पारगाव येथे बदली केली. रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच म्हणून एक अनोखी भेट रयत शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांना देण्यात आली. आजोबांनी बक्षिसी रूपाने दिलेल्या एक एकर जागेत वसलेल्या शाळेतच त्यांची बदली ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. या सर्वच शाळेतील त्यांच्या कामावर रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ नेहमीच खुश राहत. कारणही तसेच होते, या सर्व प्रवासादरम्यान ते मुख्य लेखनिक या पदावर काम करीत असताना शाळेच्या व्यवहारात कोणताही अपहार ना त्यांनी केला ना त्यांच्यामार्फत कोणाला करू दिला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ते कुबेर म्हणून त्यांना शाळेत संबोधले जावू लागले. कुबेर ही उपमा ज्ञानेश्वर पाटील यांना मिळणे ही बाब मुळात कौतुकास्पद असल्याचे दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले.
दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले की, मला सेवानिवृत्त होऊन २७ वर्षे झाली. मी आजही निरोगी आहे. सध्या माझे वय ८७ वर्षांचे आहे. आपण दररोज घरातील किरकोळ कामे स्वतः करीत असतो. ज्ञानेश्वर पाटील यांनीही घरातील परिसरातील छोटीमोठी कामे करून आपले शरीर सुदृढ ठेवावे. त्यांच्या अर्धांगिनी वनिता पाटील, बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेले त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील, स्नुषा अवंतिका आणि धा.चिरंजीव केतन पाटील यांची भरभक्कम साथ असल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांचे उर्वरित आयुष्यही आनंदात जाईल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.