मुंबई : येत्या ३१ मार्चपासून पटणा, बिहार येथे होणाऱ्या ३४ व्या किशोरी गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची दृष्टी निलेश कुंभार हिची महाराष्ट्राच्या किशोरी कबड्डी संघात निवड झाली आहे. पुणे फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या ३४ व्या किशोरी अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत दृष्टीने मुंबई शहर संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. त्या स्पर्धेनंतर महाराष्ट्र राज्य किशोरी कबड्डी मुलींच्या संभाव्य संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या दृष्टी निलेश कुंभार व पायल सुधाकर कांचन या दोघींची निवड अहमदनगर नेवासा येथे झालेल्या सराव शिबीरासाठी झाली होती. परंतु पायल कांचनला मात्र महाराष्ट्राच्या मुलींच्या अंतिम संघात स्थान मिळू शकले नाही. दृष्टीला प्रशिक्षक महेंद्र जंगम यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे. दृष्टीच्या निवडीबद्दल संस्थेच्या व शाळेच्यावतीने तिचे खास अभिनंदन करण्यात आले आहे.