माथेरान : खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कर्जत – खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वात श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. सलग दोनदा खासदारकीचा प्रदीर्घ अनुभव पाठिशी असणारे आणि पाच वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बारणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला होता. याही वेळेस त्यांना विकास कामाच्या जोरावर आणि समस्त शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा विजयश्री मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसैनिक सज्ज झाले असून श्रीरंग बारणे कर्जतमध्ये आले असता त्यांचे शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यावर जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी बारणे यांना हॅट्रिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.