रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ चे प्रकाशन

 

 

 

ठाणे : न्याय अडचणी सोडविण्यासाठी मी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध राहणार असल्याचे आश्वासन मुंबई मंडळाचे वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी मनीष सिंह यांनी दिले. रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ या त्रैमासिकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मनीष सिंह बोलत होते.
‘आजोबापासून मी रेल्वे परिवाराचा सदस्य असून माझे वडील, चुलते सुद्धा रेल्वे कर्मचारी होते. त्यामुळे समस्त रेल्वे परिवाराविषयी मला नितांत आदर असून पदाच्या माध्यमातून मला मिळालेल्या अधिकाराचा वापर कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिकाधिक कसा करता येईल यावर माझा कटाक्ष राहिला आहे. तुमच्या न्याय अडचणी सोडविण्यासाठी मी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध राहणार’, असे आश्वासन देऊन पुढे ते म्हणाले , ‘तुमच्या या मराठी भाषेतील ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’चे भविष्यात हिंदी व इंग्रजी भाषेत रूपांतरित होऊन ते अधिकाधिक रेल्वे पेन्शनर्स पर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरो.’
रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ या त्रैमासिकाचे प्रकाशन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, मुंबई मंडल मनीष सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी, २६ जुलै रोजी रेल्वे स्कुल कल्याण येथे शेकडो रेल्वे पेन्शनर्स॔च्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. याप्रसंगी मुंबई मंडळ मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ. महेंद्र गांगुर्डे, रेल्वेच्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती श्रीवास्तव, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री अतर सिंह, रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे झोनल अध्यक्ष एन. हरिदासन, झोनल महामंत्री आर. के. सारस्वत, उपाध्यक्ष अरविंद माने, कोषाध्यक्ष अनुप कुमार, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंदी व निरामय जीवनासाठी पेन्शनर्सनी आपल्या खाण्या -पिण्याच्या सवयित व जिवन जगण्याच्या शैलीत बदल करने अत्यंत आवश्यक आहे. उतारवयात अधिक खाणे टाळावे तसेच एकाच ठिकाणी तासनतास बसून रहाणे, अथवा झोपून रहाणे धोकादायक असून शरीराची सतत हालचाल चालू ठेवणे गरजेचे आहे. मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे, यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवल्यास आपण औषधांपासून अलिप्त राहू शकतो व स्वतःला आनंदी ठेऊ शकतो, असे मनोगत मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ महेंद्र गांगुर्डे यांनी व्यक्त केले.यावेळी रेल्वेच्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ज्योती श्रीवास्तव, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन चे राष्ट्रीय महामंत्री श्री अतर सिंह, कल्याण (प.) शाखेचे ज्येष्ठ अध्यक्ष एस के घुमरे, सिसोदिया आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन हरिदासन यांनी केले तर सूत्रसंचालन आर के सारस्वत यांनी केले व आभारप्रदर्शन अरविंद माने यांनी केले.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *