नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने केलेल्या

 

 

नवी मुंबई : पुणे शहर व परिसरात अतिवृष्टीतील पूर परिस्थितीमुळे ओढवलेल्या अडचणीच्या स्थितीत पूर ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक धावून गेले आहे. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले आहेत.
पुणे येथे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे 115 जणांचे पथक तयार केले व त्यांना 2 जेटींग मशीन व आवश्यक स्वच्छता साधनांसह शनिवारी सकाळी एनएमएमटीच्या 2 बसेसने पुण्याकडे रवाना केले.
त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आपले सहकारी स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, नितीन महाले, नवनाथ ठोंबरे व विजय काळे यांच्यासह साफसफाई कामाचे नियोजन केले व सोबतच्या 2 स्वच्छता पर्यवेक्षक आणि 100 हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले. त्या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरही त्याठिकाणी फवारण्यात आली.
या पथकाने ज्या आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केले त्याची प्रशंसा तेथील माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे तसेच त्या परिसरातील नागरिकांनी केलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच धावून गेली असून पुणे येथील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची तेथील नागरिकांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेकडूनही आभार व्यक्त करीत दखल घेण्यात आलेली आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *