रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा
ठाणे : राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्याविरोधात रिपाइं एकतावादीने रणशिंग फुंकले आहे. या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं एकतावादीने दिला आहे.
रविवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादी या पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा नानासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली शास्री नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सामाजिक न्याय विभागाच्या निधी कपातीस विरोध करण्याचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. या मेळाव्यात आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदींवर चर्चा करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध, मातंग , चर्मकार समाजावर अन्याय – अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहेत. त्याविरोधातही या बैठकीत जनआंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी, परदेशी शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये ५० टक्क्याने कपात करण्यात आली आहे. तसेच, अटीदेखील जाचक करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित विकासावर खर्च करण्याऐवजी इतरत्र वळविण्यात येत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, मात्र, त्यांच्याकडून जर असे होणार असेल तर मागासवर्गीय समाजावर हा मोठा अन्याय आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. जर, त्यानंतरही जर निधी वर्ग करणे थांबविले नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा दिला. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष विकास निकम, कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे, राष्ट्रीय युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे , राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हाद सोनावणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.
00000
