रमेश औताडे
मुंबई : सर्वोच्य न्यायालयाचे आदेश असताना फेरीवाला धोरण तयार करण्यास सरकार विलंब लावत असल्याने राज्यातील २०० पेक्षा जास्त फेरीवाला संघटना एकत्र येत असून मंत्रालयावर ३ लाख फेरीवाल्यांचा मोर्चा काढणार असल्याची माहिती जनवादी होकर्स सभा या संघटनेचे अध्यक्ष कोम्रेड के नारायण यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील २०० पेक्षा जास्त फेरीवाला संघटना फेरीवाला धोरण अंमलबजाणी साठी एकत्र येत आहेत. फेरीवाला कायदा २०१४ ची अंमलबजावणी करा म्हणून सर्वोच्य न्यायालयाने आदेश दिले आहेत. वेळोवेळी सर्वेक्षण करून अधिकृत व अनधिकृत फेरीवाले यांची संख्या ” शहर फेरीवाला समिती ” कडे आली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून त्याची अंमलबजावणी करू असे काही सरकारी अधिकारी सांगत आहेत. मात्र खरे पाहता हप्ता बंद होईल या भीतीपोटी काही अधिकारी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजाणी करत नाहीत.असा आरोप कोम्रेड के नारायण यांनी यावेळी केला.
करोडो रुपयांचा हप्ता पालिका,पोलिस,शासन व इतर संबंधित यंत्रणा महिन्याला गोळा करत आहे असा आरोप करत के नारायण म्हणाले, याचे सर्व पुरावे असणारी हप्ता डायरी कुणाकडे आहे याची आम्हाला माहिती होती. मात्र ती डायरी आता गायब केली असल्याची माहिती समोर येत असून त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यात वाद सुरू आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहेच मात्र त्या अगोदर सर्वोच्य न्यायालयाचे फेरीवाला धोरण आदेश अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
0000
