एकाचवेळी आठ डॉक्टर होणार निवृत्त
मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक तसेच राज्य शासन व पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक आणि अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील (एम्स) डॉक्टरांची निवृत्तीची वयोमर्यादा ६४ ते ६७ वर्षे इतकी असतानाही परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय हे ६० वर्षे आहे. ही निवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी टाटा कॅन्सर रुग्णालयातील आजी-माजी डॉक्टरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयात कर्करुग्णांचा ओघ वाढत असताना आगामी वर्षात येथील आठ डॉक्टर निवृत्त होणार असल्याने रुग्णांच्या उपचारात अडचण निर्माण होण्याची भीती काही ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
टाटा कॅन्सर रुग्णालय ही स्वायत्त संस्था असून केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी विभागाच्या अखत्यारित येते. फेब्रुवारी १९४१ मध्ये मुंबईतील परळ येथे स्थापन झालेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाचा मागील काही वर्षात विस्तार झाला असून खारघर व हाफकिन संस्थेत नव्याने मोठ्या प्रमाणात बेड उभारण्यात येत आहेत. परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात एकूण ७४० खाटा असून वर्षाकाठी ७८ हजार नवीन रुग्ण उपचारासाठी येत असतात तर जुने व नवीन रुग्ण मिळून पावणेदोन लाख रुग्णांवर वर्षाकाठी उपचार करण्यात येत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या टाटा कॅन्सर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचारी मिळून सुमारे तीन हजार लोक काम करत असून या सर्वांची निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे एवढी आहे. येथील प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टरांमुळे रुग्णांची मोठी सेवा होत असून खारघर येथे पुढील वर्षापर्यंत ९०० खाटांची रुग्णोपचारासाठी भर पडणार आहे तर हाफकिन संस्थेत आगामी चार वर्षात ४०० नवीन खाटांचे सुसज्ज विस्तारित रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. या रुग्णालयात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे असल्याचा मोठा फटका आम्हाला बसत असल्याचे यथील डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
0000