अजितदादा गटाचा हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आज मनसेवर शाब्दीक हल्लाबोल केला. राज ठाकरेंची मनसे महायुतीच्या काडीच्याही कामाची नाही, तेसच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
मंगळवारी अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. गाडीचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, या घटनेनंतर राज ठाकरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

या घटनेवेळी एका मनसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज ठाकरेंवर फौजदारी कारवाई करण्यात यावी असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. लाठीकाठ्या आणून काही जण त्यांना मारायला आले होते. दरवाजा उघडला नाही म्हणून गाडी फोडली. यासाठीच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करा आमची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे असंही ते यावेळी म्हणालेत.

राज ठाकरे रात्री पिचर बघतात, उशिरा उठतात, काम काही करत नाही. पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत. ते कुत्र्यांसोबत खेळत बसतात. राज ठाकरेंच्या मनसेला कशाला महायुती सोबत घ्यायचं? ते काही कामाचे नाहीत. त्यांनी वेगळी निवडणूक लढवावी म्हणजे लोकांना समजेल त्याची ताकद किती आहे, अशा शब्दांमध्ये उमेश पाटलांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

माझा जीव जायची वाट बघतायत का ?- मिटकरी

राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते. माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही. माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

मिटकरीसारख्या फालतू माणसावर

मला बोलायचे नाही- कर्णबाळा दुनबाळे

अमोल मिटकरीसारख्या फालतू माणसाबद्दल काय बोलणार? अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला झाला तेव्हाची व्हीडिओ क्लीप पाहा, मी कुठेच नाही.  अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ला ही क्रियेला प्रतिक्रिया होती, असे कर्णबाळ दुनबाळे यांनी म्हटले आहे. कर्णबाळा दुनबाळे यांनी गुरुवारी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *