नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याला दुजोरा दिला आहे.
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूननं देशाच्या मोठ्या भागांत धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (31 जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सुमारे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्येही ढगफुटीची घटना घडली आहे.
कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे हाहाःकार
हिमाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात ढग फुटण्याच्या घटना घडल्या. कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील अनेक लोक ढग फुटीनंतर बेपत्ता आहेत. 20 हून अधिक घरं जमीनदोस्त झाली असून अनेक वाहनं वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एक मृतदेह सापडला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनानं हवाई दलाला बचावासाठी सतर्क केलं आहे. घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतलं आहे.