अनिल ठाणेकर

 

अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरकडून ग्राहकांची फसवणुक होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने दक्षता घेणे गरजेचे आहे. याबाबत मंगळवारी ठाणे पालिका आयुक्तांच्या दालनात आयुक्त, वास्तूविशारद व ग्राहक प्रतिनिधींबरोबर बैठकीचे आयोजन केलेले आहे जेणेकरून अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या सर्व ग्राहकांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विवियाना मॉल शेजारी अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरचे अनेक विकास प्रकल्प असून त्यामध्ये ज्युरी नावाच्या गृहप्रकल्पाचा देखील समावेश आहे. सन २०१६ मध्ये अश्विन शेठ ग्रुप बिल्डरने हा प्रकल्प लॉन्च केला असून बहुतांश घरे ही मध्यमवर्गीय ग्राहकांना विकली गेलेली आहेत. यामध्ये २८ माळ्याचे  ३ टॉवर असून ६ विंग आहेत. प्रत्येक माळ्यावर ४ फ्लॅट आहेत.  सन २०१७ मध्ये रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अश्विन शेठ ग्रुप बिल्डरने ग्राहकांना डिसेंबर २०२२ ही पजेशनची अंतीम तारीख दिली होती. परंतू, सन २०२४ उजाडले तरी अद्यापपर्यंत या शेकडो ग्राहकांना घरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अश्विन शेठ ग्रुप बिल्डरच्या पार्ले येथील व्यावसायिक कार्यालयावर व ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे तेथील कार्यालयावर हे सर्व ग्राहक दर शनिवार-रविवार रूमचे पजेशन मागण्यासाठी जात होती परंतू, या सर्व ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जात होती.काही ग्राहकांच्या मतानुसार अश्विन शेठ ग्रुप बिल्डरच्या विकास प्रकल्पाला बांधकाम नकाशे मंजूर नसतानाही घरे विकली गेलेली आहेत. तसेच ग्राहकांना रूम बुकिंग करताना घर वेगळे दाखविले परंतू, पजेशन देताना मात्र वेगळ्याच ठिकाणी घरे देत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्राहकांच्या प्रतिनिधींनी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली. ३ ऑगस्ट, २०२४ रोजी अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरकडून सर्व ग्राहकांना साईटवर बोलाविले असता विकासकाच्या वतीने त्यांच्या एच.आर. डिपार्टमेंटने पजेशन आता यावर्षी न देता सन २०२५ मध्ये देऊ, असे सांगितले. त्यामुळे सर्व ग्राहक भडकले व बिल्डराच्या विरोधामध्ये नारे लावायला लागले. यावेळी ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला होता. १५० ते २०० ग्राहकांच्या जमावाने बिल्डरांच्या कर्मचार्यांना घेराव घातला त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यावेळी विकासकांनी पोलिसांना बोलाविले. हे मुख्यमंत्र्यांचे ठाणे असून या परिसराचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिनिधीत्व करीत असतील व या ठिकाणी ९० टक्यांपेक्षा अधिक ग्राहक महाराष्ट्रीयन असतील तर ठाण्यामध्ये विकासकांकडून ग्राहकांची फसवणुक करण्याची हिंमत कशी काय होते, असे ग्राहकांनी सांगितले. ही सर्व घटना स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना कळताच ह्या प्रकल्पाच्या जागेवर जाऊन या प्रकल्पाचे वास्तुविशारद प्रवीण जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मतदारसंघातील प्रकल्पांमध्ये कुणाची फसवणुक होऊ देणार नाही असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यासाठी महापालिकेने दक्षता घेणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी ठाणे मनपा आयुक्तांशी चर्चा करून मंगळवारी, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्तांच्या दालनात वास्तूविशारद व ग्राहकांच्या प्रतिनिधींबरोबर एका बैठकीचे आयोजन केलेले आहे, जेणेकरून अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या सर्व ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *