१ लाख महिला ठरल्या पात्र
एकूण लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ लाख
ठाणे- राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील एक लाख अर्जांची छाननी ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून वेळेत पूर्ण केली आहे. त्यामुळे आता ठाण्यातील एकूण लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ लाख झाली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात तीन सभागृहात सज्ज करण्यात आली होती. येथे तीन दररोज तीन सत्रांमध्ये अखंडीतपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली. त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते.अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विवेक चौधरी यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचे नियोजन केले. त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीने काम मार्गी लावले. त्याचबरोबर, महापालिकेच्या सर्व, नऊ प्रभाग समिती कार्यालयांत सहायक आयुक्त यांनीही अशाच प्रकारचे नियोजन केल्याने अर्ज छाननी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात आली.राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय १३७ मदत केंद्रे सुरू केली आहेत. या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाइन पद्धतीने पात्रता निश्चिती करण्यात आली. त्यात, ठाणे महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता.ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छाननीचे काम अतिशय वेगाने आणि नियोजनबध्द रीतीने केले. त्यामुळे दोन्ही टप्प्यात मिळून आतापर्यंत सुमारे दोन लाख महिला लाभार्थी झाले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत त्यात आणखी भर पडेल, असा विश्वास, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.