भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शस्त्रक्रियेसाठी केली ६ लाखांची मदत
अशोक गायकवाड
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मेढेखार गावातील सारांश प्रशांत ठाकूर या साडेचार वर्षिय मूकबधिर बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. या बालकावर श्रवणशक्ती सुधारण्यास मदत करणारी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नुकतीच मुंबईतील रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी ६ लाख ८ हजार रुपयांची मदत रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२) सारांशच्या आई, वडिलांनी सारांशसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सारांश याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मेढेखार येथील सारांश प्रशांत ठाकूर हा बालक जन्मतः मुकबधीर आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने सारांशच्या पालकांनी त्याच्यावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी तत्काळ हालचाल करीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी मंजूर करीत, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ६ लाख ८ हजार रुपयांचा निधी रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग केला. अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसविले जाते. त्याद्वारे बाहेरील ध्वनिलहरीचे इलेक्ट्रिक ध्वनिलहरीत रूपांतर होऊन जन्मजात कर्णबधिर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते, सारांश यांच्यावर ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या करण्यात आली आहे.
कॉक्लियर इम्प्लांटमध्ये दोन मुख्य घटक असतात: एक बाह्य प्रोसेसर आणि अंतर्गत इम्प्लांट. बाह्य प्रोसेसर वातावरणातील ध्वनी कॅप्चर करतो आणि त्यांचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. हे सिग्नल मॅग्नेट आणि स्कॅल्पवर ठेवलेल्या कॉइलद्वारे अंतर्गत इम्प्लांटमध्ये प्रसारित केले जातात. इम्प्लांटचे इलेक्ट्रोड अॅरे शस्त्रक्रियेने कोक्लियामध्ये घातले जाते, श्रवण तंत्रिका उत्तेजित करते, मेंदूला सिग्नल पाठवते. मेंदू या सिग्नल्सचा ध्वनी म्हणून अर्थ लावतो, ज्यामुळे व्यक्तींना भाषण आणि पर्यावरणीय आवाज समजू शकतात. सारांश ठाकूर या मूकबधिर बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ५ वर्ष आतील बालकांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया अधिक प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ वर्षांच्या आतील मूकबधिर बालकांच्या पालकांनी जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संपर्क साधावा. पात्र बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शात्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ते आर्थिक सहकार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती डॉ. भरत बास्टेवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी दिली.
000000
