ठाणे : उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल criminal writ petition नं.२९११/२०२२ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह मंडळ अधिकारी मुंब्रा व मंडळातील सर्व तलाठी यांनी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली.
अनधिकृत रेती उत्खनन वाहतूक रोखण्यासाठी सोमवारी बोटी द्वारे गस्त घातली असता, खाडी पात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे 15 ब्रास रेतीने भरलेली एक बार्ज तसेच एक सक्शन पंप आढळून आले. अशाच प्रकारच्या दुसऱ्या कारवाईत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे १३ ब्रास रेतीने भरलेली दुसरी बार्ज तसेच एक सक्शन पंप कळवा बाळकुम खाडीत आढळून आले. परंतु हे बार्ज व सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढता येत नसल्याने बार्ज व सक्शन पंप जाळून खाडीमध्ये बुडवून नष्ट करण्यात आले असून यापुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
