ऑक्टोबरमध्ये आचारसंहीता लागू होणार
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूकीची आचारसंहीता लक्षात घेऊन राजकीय ‘कामां’चा उरक मंत्रालयात वाढू लागलाय. फाईल झपाट्याने हातावेगळ्या केल्या जाऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे सरकारने उद्घाटनांचा सपाटा लावला आहे.
येत्या १० किंवा ११ ऑक्टोबरला आचारसंहीता लागू शकते असे विश्वसनीय सुंत्रांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होईल. मतदार संघाची पुर्नरचना झाल्यापासून खरं तर महाराष्ट्राची निवडणूक ही हरयाणासोबत गेली तीन टर्म एकत्र झाली आहे. यंदा पहिल्यांदाच ती एकत्र होत नाहीय.
महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारांसाठी पोषक नाहीय, आणि म्हणूनच निवडणूक लांबवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार भाजपची थिंक टॅंक करीत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे सरकारविरोधातील नाराजी कमी झाली असून त्याचा लाभ उठवण्यासाठी निवडणूक नोव्हेंबरमध्येच घेण्याच्या हालचाली सुरु असल्याती माहीत सुत्रांनी दिली.
आज सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाच्या ताब्याबाबत सुनावणी होती. पण ही सुनावणीही आता २१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण आणि घड्याळ ही चिन्ह अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडेच राहतील असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. निवडणूका लवकर जाहीर झाल्यास कदाचित ठाकरे आणि शरद पवार गटाकडून पुन्हा हस्तक्षेप याचिका सादर केली जाऊ शकते असेही जाणकारांचे मत आहे.
एकुणच या सगळ्या घडामोडी या महायुतीला लाभदायक अशाच असून निवडणूका नोव्हेंबरमध्येच होतील असे सुत्रांचे म्हणणे आहे.
वर्षा बंगल्यावरील बैठकीमुळे खळबळ
मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे तसेच मंत्री उदय सामंत यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर आतापर्यंत रात्री झालेल्या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही कायम असायची. बंद दाराआड तिघांमध्ये तासनतास चर्चा व्हायची. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांच्याविना झालेली ही पहिलीच बैठक होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियान, जागा वाटपांचा समपोचाराने तिढा सोडवण्या संदर्भातील बैठकीत महायुतीतील प्रमुखनेते देवेंद्र फडणवीसच उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेषतः फडणवीस हे मुंबईत असूनही बैठकीला नव्हते. नेमकं महायुतीत चाललयं काय असा प्रश्न आता उद्भवू लागला आहे. या पूर्वीही या योजनांच्या जाहिरातीवरून युतीतील प्रमुख नेत्यांचे फोटो नसल्यावरून चर्चा रंगल्या असताना, काल झालेल्या बैठकीत देवेंद्रजीची अनुउपस्थिती लक्ष वेधणारी आहे. यावरून युतीत सर्व काही अलबेल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
