नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्याप्रमाणेच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या स्वच्छतामित्रांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. या अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ हा उपक्रम राबविला जात असून आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 हून अधिक स्वच्छताकर्मींसोबत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहून घ्यावयाची काळजी याविषयी सुसंवाद साधण्यात आला.
सलाम मुंबई फाऊंडेशन या संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींसाठी हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला असून यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आपल्या आरोग्यावर कसा घातक परिणाम करते व यापासून होणारे कॅन्सरसारखे आजार कसे जीवघेणे ठरतात याविषयी चित्रफितीव्दारे माहिती देत प्रबोधन करण्यात आले.
सलाम मुंबई फाऊंडेशनचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक नारायण लाड यांनी सादरीकरणाव्दारे चित्रे दाखवून माहिती दिली. त्याचप्रमाणे ‘से नो टू टोबॅको’ अर्थात ‘तंबाखूला नकार देणे’ आपल्या स्वत:च्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे याविषयीही त्यांनी जागरुकता निर्माण केली. यावेळी त्यांच्यासमवेत फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक अजय घंगाळे उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे व डॉ. संतोष वारुळे यांच्या नियंत्रणाखाली आयोजित अशी तंबाखूमुक्त शिबीरे यापुढील काळात सर्व विभाग स्तरावर आयोजित केली जाणार आहेत व स्वच्छताकर्मीमध्ये तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी व आरोग्याची जपणूक करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.
०००००