अनिल ठाणेकर

ठाणे : परदेशात जसे “वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून पर्यटनाला चालना दिली जाते त्याच पद्धतीने ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील खाडी लगत असलेले आरक्षित क्षेत्र  “वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” करिता आरक्षित करावे यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक हे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन मौजे भाइर्दरपाडा, मोघरपाडा, वडवली, कावेसर आणि कोलशेत येथील खाडीलगत असलेले क्षेत्र “वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” करिता आरक्षित करण्यात आले असून त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा लाभलेला असून आजतागायत या खाडी किनार्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुनियोजित विकास न झाल्याने व दुर्लक्षित क्षेत्र असल्याने तेथे पर्यटक जास्त प्रमाणात आकर्षित होत नव्हते. तसेच खाडीलगत असलेले क्षेत्र, कांदळवने अतिक्रमणाने नष्ट करून तेथे सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत होते. यावर निर्बंध आणून कांदळवने संरक्षित करून खाडी किनारा सुनियोजित पध्दतीने विकसित करता यावा यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक प्रयत्न करीत होते. त्यानुसार घोडबंदर रोडवरील गायमुख येथील खाडी किनारी स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा टप्पा क्र. १, टप्पा क्र. २ नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून चौपाटीचा टप्पा क्र. ३ चे देखील मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते भुमिपूजन करण्यात आले असून त्याचे देखील काम सुरू करण्यात आले आहे. खाडी किनाऱ्यावर बसण्याची-फिरण्याची सोय, गार्डन, आकर्षक लायटिंग संपूर्ण साैंदर्यीकरण केले  जाणार आहे. खाडीमध्ये वॉटर स्पोर्ट्स, जवळच जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, गेम झोन तयार केले जातील. तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशा पद्धतीने येथे खाडी किनारा विकसित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या नागरिकांना धार्मिक विधीकरिता तेथे विर्सजन घाट व दशक्रिया विधी घाट बांधण्यात येणार असून गाड्या पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सुसज्य जेट्टी उभारण्यात येणार असून खाडी जल स्त्रोतामध्ये जलवाहतुक, वॉटर टॅक्सी यासारखे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या खाडी किनार्यावर जिथे कांदळवने आहेत त्यांचे जतन करून त्या ठिकाणी लाकडाचे म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य वापरण्यात येणार आहे. तसेच हंगामी पर्यटनाद्वारे जागा निश्चित करून फ्लेमिंगो स्थलांतर, डॉल्फिन स्थलांतर, ऍग्रो पार्क याद्वारे स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. जेणेकरून या स्थळांकडे व क्षेत्राकडे पर्यटक आकर्षित होतील व त्याद्वारे स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. भाइर्दर पाडा येथील ८०० मीटर लांबीची असलेली चौपाटी पुढे जावून २.४ कि.मी. पर्यंत होणार असून त्याचा फायदा घोडबंदर रोडवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सदरहू चौपाटीचे काम पुर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील खाडी किनार्यावर ६ कि.मी. लांबीची सर्वात मोठी चौपाटी होणार असल्याने यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या आरामाराची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील ही चौपाटी एक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगून खाडीलगत असलेले क्षेत्र “वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” करिता आरक्षित केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *