ठाणे : ठाण्यातील बचत गटाच्या महिलांना शिवसेनेच्या आनंद आश्रमात बोलावून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. आचारसंहितेच्या कालावधीत बचत गटांना प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी मिनाक्षी शिंदे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत एखाद्या पक्ष कार्यालयात अशाप्रकारे पैशांची घेवाण-देवाण कशी होऊ शकते. असा प्रश्न जया यांनी उपस्थित केला आहे. तर, हे चित्रीकरण जुने असल्याचा दावा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे आश्रम ठाण्यातील टेंभीनाका भागात आहे. या आनंद आश्रमात सध्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बैठका घेतात. सोमवारी रात्री आनंद आश्रमातील एक चित्रीकरण प्रसारित झाले आहे. या चित्रीकरणात मिनाक्षी शिंदे या बचत गटातील महिलांशी संवाद साधत आहेत. बचत गटांना अनुदान सुरूच राहणार आहे. पुढील वर्षी देखील असेच अनुदान वाटप होईल. बचत गट केवळ अनुदान घेण्यासाठीच संपर्कात राहील, इतर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही येणार नाही असे होऊ नये. बचत गटांचा नगरसेवकांसोबत कायम संपर्क असायला हवा. नगरसेवकांनी देखील बचत गटांचा एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करावा. जेणेकरून त्यांना वारंवार कोणतीही गोष्ट न सांगता, संदेश व्हाॅट्सॲप क्रमांकावर पाठविल्यास तो संदेश महिला बघतील आणि ते संपर्क साधतील. गेल्या महिन्यात आपण घरघंटी आणि शिवण यंत्रांचे वाटप केले होते. नगरसेवकांशी संपर्कात राहाल तरच तुम्हाला त्या गोष्टी वेळेवर मिळतील असे त्या म्हणाल्या.

नगरसेवक वारंवार बोलवतात. पण लक्ष देत नाहीत असे सध्या होत आहे. जेव्हा दुसऱ्यांच्या हातात अनुदान मिळते, तेव्हा महिला येतात आणि कागदपत्र घ्या असे म्हणतात. त्यासाठी एक प्रक्रिया असते. तुम्ही कागदपत्र दिल्यानंतर ते आम्हाला पुढे पाठवावे लागतात. आम्हाला मोजणी करावी लागते. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे एक प्रत आणि दुसरी प्रत आमच्याकडे ठेवावी लागते. ही एक जबाबदारी आहे, आर्थिक व्यवहार करताना आमच्या नावाला कोणतेही कलंक लागू नये असे त्या चित्रीकरणामध्ये सवांद साधत असताना दिसत आहे.

हे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. आचारसंहितेच्या कालावधीत एखाद्या पक्ष कार्यालयात अशाप्रकारे पैशांची घेवाण-देवाण कशी होऊ शकते. तसेच नगरसेवकांच्या संपर्कात राहण्यास बचत गटांना सांगितले जात आहे. ही प्रलोभने आहेत असा आरोपही त्यांनी केला.

समाजमाध्यमावर प्रसारित होणारे चित्रीकरण जुने आहे. संबंधित तक्रारदारांनी आधी चित्रीकरणाबाबत माहिती करून घ्यावी. तसेच बचत गट नगरसेवकांच्या संपर्कात राहिल्यास त्यांना योजनांबाबत माहिती मिळत असते. त्यामुळे महिलांना नगरसेवकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. – मिनाक्षी शिंदे, माजी महापौर.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हे चित्रीकरण ट्विटरवर प्रसारित केले आहे. ठाण्यात पैसे मोजण्याचे प्रशिक्षण देतानाचे चित्रीकरण असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. नगरसेवकांच्या संपर्कात राहणे, जिथे बोलवले तिथे येणे, अशाच पद्धतीने घरघंटी आणि शिवण यंत्र दिल्याची कबुली देण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *