ठाणे : ठाणे कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेले कैदी एक प्रकारच्या तणावाखाली असतात. त्यांना या तणावातून थोडी मुक्तता मिळावी यासाठी जेल प्रशासनाने गुरुवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाण्याच्या कारागृहात हजारो कैद्यांनी आज उत्साहात सहभाग घेत दिवाळी सणाचा आनंद लुटला. दिवाळी पहाटची सोनेरी किरणे घेऊन बाहेर गेल्यावर आयुष्याची नवीन सुरुवात करणार असल्याचा विश्वास या वेळी कैद्यांनी व्यक्त केला. दिवाळी पहाट म्हणजे चैतन्यमय वातावरण. दिवाळीत ठाणे शहरात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमात सुरेल गाण्याची मैफिल रंगली जाते. ठाणे कारागृहातील कैद्यांना आनंद लुटता यावा यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रम आज सादर करण्यात आला.
कोट
ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये सुमारे ४ हजार १५० कैदी आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष कैद्यांचा सहभाग असून प्रत्येक बराकीच्या बाहेर कैद्यांनी तयार केलेल्या कंदील आणि पणत्या ही लावण्यात आल्या आहेत. तसेच कारागृहातही रोषणाई करण्यात आली आहे. तुरुंगात कैदी मानसिक तणावाखाली असतात. दिवाळी सणाच्या निमित्ताने त्यांचा हा तणाव थोडा कमी व्हावा या हेतूने दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
राणी भोसले, कारागृह अधीक्षक
०००००