चंद्रपूर : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा खळबळजनक दावा केला.
कल्याणची जागा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठीची जागा राष्ट्रवादी पक्षाने पाच वेळा निवडणुकीत पराभव झालेला व्यक्तीस उमेदवारी देऊन ती जागा त्यांच्या साठी सोडलीय. अशा अनेक जागा आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो, याचा विचार केला पाहिजे. नवीन कार्यकर्ता, मतदारसंघात नवा उमेदवाराचा चेहरा असताना त्याला डावलून नेहमीच पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहात, म्हणजे याचा नेमका अर्थ काय, हे लक्षात घेतले पाहजे. अशा वीस मतदारसंघातील नावे मला सांगता येतील, जिथे उमेदवारांची फिक्सिंग झालीय. असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना केला आहे.
अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा पक्ष संपवायला निघाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचे आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण पंतप्रधान मोदी हे मोहन भागवत यांनाही कधी भेटत नाही. पार्टीलेस देश करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांचा असून हे अतिशय धोकादायक असल्याची सांगत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवरही टीका केली आहे. आपल्या देशावर असलेले कर्ज आणि जिडीपी हा सारखा झाला आहे. आपण आज जवळ जवळ कंगाल होण्याच्या मार्गावर आहोत. तर दुसरीकडे देशात पुन्हा मोदी सत्तेत आले तर पुढच्या टप्प्यात आता ईडीच्या धाडी व्यापाऱ्यांवर होणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जालना येथे स्टील व्यापाऱ्यांवर ज्या धाडी पडल्या ते मुळात भाजप समर्थक आहेत. मात्र तरीही ही कारवाई करण्यात आली असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.