लाख 60 हजार दंड तसेच 62 किलो प्लास्टिक जप्त
नवी मुंबई : ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहचून एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असून दुस-या बाजुला प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दिवाळीच्या आधीपासूनच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यात 25 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत 1 लाख 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच 62 किलो 100 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
यामध्ये बेलापूर विभागात 18 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करत 1 लाख 25 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे, तसेच 42 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. अशाचप्रकारे नेरुळमध्ये एका दुकानावर कारवाई करत 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 1.5 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. वाशी विभागातही 1 दुकानदाराकडून 1 किलो एकल वापर प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली आहे. कोपरखैरणे विभागातही 1 दुकानदाराकडून 500 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंड वसूली करण्यात आली आहे. याशिवाय परिमंडळ 1 मधील भरारी पथकाने 15 किलो प्लास्टिक जप्ती व 5 हजार दंड वसूली आणि परिमंडळ 2 मधील भरारी पथकाने 3 दुकानदारांवर कारवाई करुन 2 किलो 100 ग्रॅम प्लास्टिक साठा जप्ती तसेच 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात नमुंमपा क्षेत्रात 1 लाख 60 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 62 किलो 100 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुळे निर्सगाला व मानवी जीवनाला होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन वापरातून पूर्णपणे हद्दपार करावे व स्वच्छ सुंदर पर्यावरणशील शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक वृध्दींगत करत रहावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.