ठाणे : शहरात सुरू असलेल्या बोगस शिक्षण संस्थांकडून सामान्य व गरीब कुटुंबातील तरुण व तरुणींची फसवणूक होत आहे. त्यामुळे याची चौकशी करून संबंधित शिक्षण संस्थांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
ठाणे रेल्वे स्टेशन, राम मारुती रोड, नौपाडा परिसरासह शहरातील महत्त्वाच्या गजबजलेल्या भागात काही बोगस शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध विद्यापीठातील अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच, अभ्यासक्रमाचे शुल्क कर्जरूपाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची कागदपत्रे मिळवून त्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या तरुण-तरुणींची भविष्यातही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप या निवेदनातून केला आहे.
