डॉ. नितीन रिंढे यांनी व्यक्त केली खंत

ठाणे: लेखकांचा ॲक्सेप्टन्स आपल्या मराठी समाजात नाही, इथे लेखकाला कोणी ओळखतही नाही. याचे मुख्य कारण साहित्याचा प्रभाव पडण्याची क्षमताच आणि वाचनाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. या दोन गोष्टीमुळे समाजभान वाढविण्यासाठी, समाजात संस्कार करण्यासाठी साहित्याचा उपयोग फारसा होताना दिसत नाही. ज्या समाजात वाचन टिकून आहे त्या समाजाची विवेकशक्ती देखील टिकून असते आणि त्या समाजाला भवितव्य सुद्धा आहे. आपल्याकडे ती समस्या मोठी आहे. आपल्याकडे वाचनच कमी असल्याने साहित्याचा परिणाम किती होणार? परंतू वाचन पुढे वाढेल असे आशावादी राहूया असे मनोगत डॉ. नितीन रिंढे यांनी व्यक्त केले.

‘साहित्य व समाजभान’ या विषयावर रविवारी सकाळी थोरले बाजीराव पेशवे सभागृह येथे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, लेखक हा सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणामधून तयार होत असला तरी सुद्धा ते एकांगी वाढणे नसते. त्या व्यक्तीचा जन्म झाल्यापासून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पिंड बनलेला असतो. त्यात अनुवंशिक गोष्टी देखील आलेल्या असतात. काही गोष्टी आधीपासून चालत आलेल्या पिंडाबद्दल असतील आणि काही गोष्टी अधिक प्रमाणातल्या या भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणामधल्या असतील. त्यानुसार जगाचे अनुभव घेतो. यातून तो इनपूट घेत जातो आणि हळूहळू त्याचे व्यक्तिमत्त्व आकाराला येईल. एकाच पर्यावरणात दोन लेखक लिहीत असले तरी ते वेगवेगळ्या प्रकारचा आशय मांडत आहेत कारण त्यांची जीवनदृष्टी वेगळी आहे, त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद वेगळा आहे. पण तरीसुद्धा भोवतालातूनच लेखक घडतो हे सत्य मात्र आपल्याला टाळता येत नाही. असे कोणतेही पुस्तक नाही की पुस्तक वाचून माणूस बदलला ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. पुस्तक वाचनाची क्रिया ही बौद्धीक आहे, त्यात मेहनत आहे, कष्ट आहेत. हल्ली लोक का वाचत नाही कारण त्यांना कष्ट आणि मेहनत नको असते असे ते म्हणाले. यावेळी डॉ. विजय बेडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष राणे तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य सुभाष शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *