ठाणे: आजच्या तरुणांमध्ये स्लीप डीस्कचे प्रमाण जास्त आहे. याला कारणम्हणजे सातत्याने बाईकवरुन होत असलेला प्रवास, डेड लिफ्ट म्हणजे व्यायाम करताना अचानक जास्त वजन उचलणे, अपघात. तसेच, मोबाईल सिंड्रोम देखील वाढताना दिसत आहे. मोबाईल पाहताना मान फार वाकवली जाते. त्यामुळे मानदुखीची समस्या वाढली आहे तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयपरत्वेमुळे हाडे ठिसुळ होणे, नस दबली जाणे हे आजार वाढताना दिसत असल्याची माहिती ऑर्थो स्पाइन सर्जन डॉ. निखिल जोशी यांनी दिली.

रविवारी सकाळी डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात पाठीची दुखणी, हाडाची व मणक्याचे आजार ,त्यावरील उपाययोजना या विषयावर जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. दयानंद कुंबळा यावेळी उपस्थित होते. नीला भागवत यांनी डॉ. जोशी यांचा परिचय करुन दिला. डॉ. जोशी यांनी सायटीका म्हणजे काय या मुद्दयाने कार्यक्रमाची सुरवात केली. सायटीका हा रोग नव्हे तर लक्षण आहे. यात पाय किंवा मानेची नस दबली जाते असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, स्पाईन हा आजार आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी संबंधीत आहे. यात वाकडे बसणे, जास्त वेळ एकाच जागी बसून राहणे, अजिबात व्यायाम न करणे, खूप वेळ व्यायाम करणे ही कारणे आहेत. तसेच, स्पाईन सर्जरीबद्दल जनमानसात गैरसमज आहे. जसे की, ही सर्जरी झाल्यावर सतत झोपून रहावे लागते किंवा अर्धांगवायू होतो. मात्र असे काही नाही आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णाला जास्त वेळ झोपून राहण्याची गरज लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *