डोंबिवली : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते आपला वेळ देत असतानाच या बिझी शेड्युल मधून वेळ काढत त्यांनी डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक गजानन व्यापारी यांच्या तब्येतीची रुग्णालयात जाऊन आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या भेटीचा फोटो समाज माध्यमांतून व्हायरल होत आहे. पक्षाच्या कामासोबतच डॉ. शिंदे आपल्या कार्यकर्त्यांची व तब्येतीची देखील तेवढीच काळजी घेत असल्याचे दिसुन येत आहे.
सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय पक्षाचे उमेदवार विविध संघटना, नागरिकांच्या भेटी गाठी घेत आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे येथील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. ते देखील विविध संघटना, संस्था, गृहसंकुल यांच्या भेटीगाठी घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत.
खासदार शिंदे हे पेशाने डॉक्टर असल्याने ते पक्षाच्या कामासोबतच आपल्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या तब्येतीची काळजी घेताना दिसत आहे. डोंबिवली शहर शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन व्यापारी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत.
एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रविवारी खासदार श्रीकांत शिंदे हे डोंबिवली एमआयडीसीच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान वेळ काढत त्यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन व्यापारी यांची भेट घेतली. त्यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेचे तसेच त्यांची आता तब्येत कशी आहे याची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली.
खासदार शिंदे हे वेळ काढून पक्षातील कोणताही कार्यकर्ता असो प्रत्येकाची माहिती ठेवत असून कोणाला काही अडचण असल्यास त्यांच्या मदतीसाठी देखील लगेच धावतात. गजानन व्यापारी यांची भेट घेत त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खासदार शिंदे यांच्या अशा नेतृत्वामुळेच प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांच्यासाठी झटत आहे अशी भावना यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केली.
