अशोक गायकवाड
रत्नागिरी : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काढले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित महिला ‘आयोग आपल्या दारी’ कार्यक्रमातंर्गत जनसुनावणीच्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतिष शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होत आहे, असे सांगून राज्य महिला आयोगाकडील अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार श्रीमती चाकणकर यांनी काढले. जनसुनावणीसाठी आलेल्या तक्रारदारांच्या कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, हुंडाबळी यासारख्या तक्रारींचे निराकरण करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. पोलीस विभाग काम करीत असताना महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते. १०९१ व ११२ या हेल्पलाईन चा वापर महिला करतात त्याचा नियमित आढावा घेतला जातो अशी माहिती दिली. जिल्हाधिकारी सिंह यांनी श्रीमती चाकणकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘सक्षम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.