डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगावात निर्जनस्थळी देऊन हत्या करण्यात आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर 24 तास उलटून जात नाही तोच मुलीचा खून करणारा कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात गुंड तथा या हत्याकांडातला मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून, तर त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण शहरातून बेड्या ठोकल्या आहेत. ही माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली.
निरागस मुलीची हत्या झाल्याने कल्याणकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोणत्याही परिस्थितीत या हत्येचा लवकरात लवकर छडा लावण्याचे जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तपास यंत्रणांना निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना महत्वाच्या टिप्स दिल्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त अतुल झेंडे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. या संदर्भात उपायुक्त झेंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 6 पथकांच्या साह्याने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात विशाल गवळी याला बुलढाण्यातील शेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत कल्याणात आणून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल. या गुन्ह्यात विशालची पत्नी साक्षी हीचा सहभाग असल्याचे चौकशी दरम्यान उघड झाल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी आहेत का, यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयास्पद हालचालींद्वारे माहिती घेऊन तांत्रिक तपास करण्यात येत आहे. त्यानुसार एक रिक्षा ताब्यात घेण्यात आल्याचे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.
कोण आहे का विशाल गवळी ?
अल्पवयीन मुलीची हत्या करून पसार झालेला विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीच्या वाढत्या उपद्व्यापांमुळे या गुंडाला पूर्वीच्या दोन प्रकरणांत जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. अलीकडेच तो जामिनावर बाहेर आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. विशालची यापूर्वी दोन लग्ने झाली आहेत. कल्याण पूर्वेत त्याची प्रचंड दहशत आहे. अपहरण करून त्या निरागस मुलीची हत्या कोणत्या कारणासाठी केली ? याचा उलगडा या गुंडाकडून लवकरच होणार आहे.
वेशांतर करून बाहेर येताच पडली मानगुटीवर थाप
मुलीची हत्या केनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचला. शेगाव परिसरात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे. तेथे तिचे नातेवाईक राहतात. कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले. सर्वांची कस्सून चौकशी केल्यावर विशाल बुलढाणा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची पथके बुलढाणा येथे त्याचा शोध घेत होते. विशालला दाढी आहे. कुणाला ओळखू नये म्हणून त्याने बुधवारी सकाळी बुलढाण्यातील एका सलूनमध्ये दाढी केली. त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडत असताना पोलिसांनी त्याच्याच्या मानगुटीवर थाप टाकली.
सहा पथके खुन्यांच्या मागावर
चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवळी याला बुलढाण्यातील शेगाव येथून ताब्यात घेतले आहे. त्याची पत्नी साक्षी हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य काहींचा सहभाग आहे का ? त्यादृष्टीने तपास केला जात आहे. त्यासाठी सहा पथके या प्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
