कपिल पाटील फाउंडेशनतर्फे ‘अटल संध्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
बदलापूर: जागतिक स्तरावर ठसा उमटविलेले पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांच्या अद्भूत स्वरांची अनुभूती हजारो बदलापूरकरांनी अनुभवली. जय हो, रमता जोगी, वो किसना है अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांचे सादरीकरण करीत सुखविंदर सिंग यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमातून एकाच वेळी जल्लोष व नृत्य करणाऱ्या रसिकांना जादुई संगीताची मेजवानी मिळाली.
भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपा व कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी बदलापूर येथील आदर्श विद्यालयाच्या मैदानावर २५ डिसेंबर रोजी `अटल संध्या’ कार्यक्रम आयोजित केला जातो. २०१४ पासून दरवर्षी अव्वल गायकांच्या सूरांची मेजवानी रसिकांना मिळते. यंदाही विख्यात पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांच्या उपस्थितीत `अटल संध्या’ काल बुधवारी उत्साहात पार पडली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला वंदन करुन सुरू झालेल्या या कार्यक्रमाला हजारो रसिकांची गर्दी झाली होती. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुलभा गणपत गायकवाड, माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, वामन म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, सिद्धेश कपिल पाटील यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
बदलापूरकरांना १० वर्षांपासून अटल संध्याच्या माध्यमातून दर्जेदार सांगितीक कार्यक्रम देत असल्याबद्दल मंत्री गणेश नाईक यांनी कपिल पाटील फाउंडेशनचे कौतुक केले. तर या कार्यक्रमाची बदलापूरची जनता चातकाप्रमाणे दरवर्षी वाट पाहत असते. या जनतेने प्रेम दिल्याबद्दल श्री. कपिल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
बदलापूरात प्रथमच सुखविंदर सिंग यांचा लाईव्ह कार्यक्रम झाला. आपल्या अनोख्या शैलीत छैया छैया, होले होले हो जाएगा, बिडी जलैले, मैं डालूँ ताल पे, लाफ्ता लाफ्ता आदी गाणी सादर केली. `सुखविंदर’मय झालेल्या वातावरणात रसिकांनी नृत्यावर थिरकत कार्यक्रमाचा आनंद लुटला. हनीफ व अस्लम यांचा ढोल आणि बासरीचे सूर रसिकांच्या मनाला स्पर्शून गेले.
या कार्यक्रमात बदलापूर येथील तरुण गायक अनय माळी यांनी आपल्या तरुण चमूसह सादर केलेल्या `स्वॉफ द बॅँड’मधून विविध मराठी, हिंदी, रेट्रो गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली. नव्या पिढीच्या नव्या दमाच्या या बॅंडबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सूकता होती. तत्पूर्वी सेंट अॅंथनी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सिद्धेश कपिल पाटील यांनी केले होते. या वेळी `कपिल पाटील भिवंडी’ या यूट्यूब चॅनलचे अनावरण करण्यात आले. हेमाली सेजपाल व संयुक्ता केळुस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
०००००