पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
ठाणे / कल्याण : ठाणे आणि कल्याण शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याने ३ ते ४ दिवस अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे संदेश गृहसंकुलाच्या व्हॉट्सॲप समुहात प्रसारित होत आहेत. परंतु जलशुद्धीकरण केंद्रात कोणताही बिघाड झालेला नसल्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे ठाणे आणि कल्याण पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे चिंतेत पडलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
ठाणे आणि कल्याण शहरातील गृहसंकुलांच्या व्हाॅट्सॲप समुहामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक संदेश प्रसारित होत आहे. यामध्ये ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणी गरम करून प्यावे. कारण, जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेत बिघाड झाला असून येत्या ३ किंवा ४ दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे शुद्धीकरणाविनाच पाण्याचा पुरवठा करणार आहे, असे संदेशात म्हटले आहे. अशुद्ध पाण्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. परंतु ही केवळ अफवा असल्याचे आता पालिकेच्या स्पष्टीकरणानंतर उघड झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. या स्रोतांकडून जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा अद्याप तरी संदेश प्राप्त झालेला नाही, असे ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व यंत्रणा सुस्थितीत सुरू आहेत. दोन्ही शहरांना निर्जंतुक आणि स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा पालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या लघुसंदेशावर विश्वास ठेऊ नये. यापूर्वीही असाच लघुसंदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून नागरिकांची दिशाभूल करण्यात आली होती. नागरिकांनी अशा संदेशावर विश्वास ठेऊ नये, असे कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी स्पष्ट केले.