माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून आयोजन
ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : कोपरीवासीयांच्या डोक्यावर हक्काच्या घराचे छत असावे, विकसकाकडून होणारी फसवणूक टळून घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी कोपरी येथील सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञात जागर करण्यात आला. कोपरीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत व विकसकांकडून होणाऱ्या संभाव्य फसवणुकीबाबत रहिवाशांचे प्रबोधन करण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रमांतून नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. कोपरीमध्ये मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहेत. या पार्श्वभूमीवर महायज्ञाचे औचित्य साधून भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला कोपरी भागातील रहिवाशी सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी कोपरीच्या भविष्यातील विकासाबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.
कोपरी परिसरातील ३० टक्के सोसायट्या सीआरझेड २ मध्ये येत आहेत. मात्र, या प्रश्नावर माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी पुढाकार घेऊन रहिवाशी सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत नवी दिल्लीत दाद मागितली. त्यानंतर २०१९ च्या कायद्यानुसार दिलासा मिळाला असून, आता सीआरझेड २ मधील इमारतींचाही विकास होऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९-अ नुसार पुनर्विकासासाठी प्रत्येक सोसायटीने नियमानुसार प्रक्रिया राबवावी. एखाद्या विकसकाकडून वाढीव `एफएसआय’ व अन्य आश्वासनांना बळी पडू नये. त्या विकसक कंपनीचा पूर्वेतिहास तपासावा. त्यांनी पूर्ण केलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी करुन तेथील रहिवाशांकडून माहिती घ्यावी. त्यानंतरच सोसायटीने पुनर्विकास प्रकल्प राबवावा, असे आवाहन वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी केले.
कोपरीवासियांना कोपरीतच घराचा प्रयत्न
जागांच्या वाढत्या किंमतीमुळे ठाण्यातील कुटुंबे बदलापूर, कर्जत, टिटवाळ्यापर्यंत स्थलांतरीत झाली. परंतु, कोपरीतील रहिवाशांनी कोपरीतच नव्या घरात राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सोसायट्यांनी एकत्रित येऊन निविदा प्रक्रिया राबवून सोसायटीचा विकास करावा. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना सर्वोतोपरी साह्य केले जाईल, असे आश्वासन. भरत चव्हाण यांनी दिले.
कोपरीवासियांना चांगले व रुंदीकरण झालेले रस्ते, उत्तम मार्केट, नाट्यगृह आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीकोनातून `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ साकारले जात आहे, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी दिली.
0000
