सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीने अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज
विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी दाखल केली. तर उद्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाले तर महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणार, अशी देखील माहिती मिळत आहे.
विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते झाले होते आक्रमक
दरम्यान, काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे याआधी दिसून आले. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावीम असे पत्र अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने लिहले होते. तसेच रक्ताने लिहिलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले होते.
माजी आमदाराने दिला विशाल पाटलांना पाठींबा
दरम्यान, सांगलीत गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांच्या उमेदवारी विरोधात रोष समोर येत आहे. त्यातच माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांची ताकद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.