मुंबई आणि परिसराच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरायला लागली आहे. गेले काही दिवस मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरली आहे याचा दुष्परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. मुंबईच्या हवेत धुळीचे बारीक कण असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वृध्द नागरिक, गरोदर महिला तसेच रुग्णांवर होऊ लागला आहे. मुंबईत दम्याचे रुग्ण वाढू लागले आहेत त्यामागेही हेच कारण आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत त्यात प्रामुख्याने सांगता येण्यासारखे कारणे म्हणजे वाढते औद्योिकीकरण, वाहनांचे प्रदूषण, वाढती बांधकामे ही आहेत. मुंबईत, रस्ते, मेट्रो, इमारती आदींचे बांधकामे सुरू असून त्यासोबतच वाहनांमधून उत्सर्जित होणारे कणही वातावरणात जमा होतात. हवेतील धूळ, कण आणि इतर प्रदूषण करणारे घटक पावसामुळे वातावरणातून बाहेर पडतात. पावसाळा संपला तरी हे कण हवेतच राहतात. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरण्यामागे देखील हेच कारणे आहेत. मुंबईच्या हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती नेमायला हवी. या समितीने मुंबईच्या हवेचा दर्जा कसा सुधारेल याचा अभ्यास करावा त्यासाठी या समितीला परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली तरी सरकारने ती मिळवून द्यावी कारण मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरणे म्हणजे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येणे. मुंबईकरांचे आरोग्य टिकवायचे असेल तर हवेच्या प्रदूषणावर ठोस उपाय करावाच लागेल. दिवाळी नंतर हे वायू प्रदूषण आणखी वाढेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता तो खरा ठरला. सरकारने दसरा, दिवाळी, नाताळ व नववर्षात वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर देखील बंदी घालावी कारण फटाक्यांच्या प्रदूषणाने हवा आणखी खराब होते त्याचा दुष्परिणाम शेवटी मुंबईकरानांच भोगावा लागतो. चक्रीवादळ, मुसळधार पाऊस याची माहिती जशी एस एम एस ने दिली जाते तशी दुसऱ्या दिवसाच्या संभाव्य प्रदूषण पातळीची माहिती देता येईल असे तंत्रज्ञान तयार करावे जेणेकरून नागरिक प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करतील. मुंबईतील वाढत्या वाहनांवर देखील नियंत्रण आणावे, वाढत्या वाहनांमुळे देखील प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत सम विषमचा प्रयोग करावा. नागरिकांनीही सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. वाढते प्रदूषण ही खूप गंभीर समस्या आहे. ही समस्या केवळ मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच नाही आहे असे नाही तर संपूर्ण देशातच ही समस्या आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कायम स्वरुपी ठोस उपाययोजना करावेत.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *