बाळ शोधण्यात नाशिक पंचवटी पोलिसांना यश
हरिभाऊ लाखे
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळी मातेच्या डोळ्यांदेखत बाळ चोरले. महिलेचे हे कृत्य काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. आता हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आले असून चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात पोलिसांनी सुरक्षितपणे आईच्या कुशीत पोहोचवले आहे.
पाच दिवसाच्या बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळी मातेच्या डोळ्यांदेखत बाळ चोरी करून पळ काढला होता. मूळचे उत्तर प्रदेशचे सध्या सटाणा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेख कुटुंबातील सुमन अब्दुल खान हिला प्रसव वेदना सुरू झाल्याने 28 डिसेंबर 2024 रोजी पती अब्दुल याने प्रसूतीसाठी महिलेला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 डिसेंबर 2024 रोजी ही महिला प्रसूत होऊन तिने एका गोंडस गुटगुटीत बाळाला जन्म दिला.
संशयित महिलेने याप्रकारे बाळाला चोरले
बाळाची माता प्रसूतीपश्चात कक्षात दाखल असताना बाळ हे बेबी केअर युनिटमध्ये होते. त्याचवेळी एक संशयित महिला गेल्या चार ते पाच दिवसांपासून बाळंतीण महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात होती. माझे नातलग दुसऱ्या बॉर्डमध्ये ॲडमिट असून त्यांची सुश्रूषा करण्यासह डबा पुरविण्यासाठी मी येत असते, असे सांगत तिने मराठी व हिंदी भाषेचा भडिमार करून बाळंतीन महिलेशी ओळख वाढविली. याच ओळखीचा गैरफायदा घेत संशयित महिलेने गुटगुटीत बाळ आवडत असल्याने मागील तीन दिवसांपासून हाताळले. महिलेवर बाळंतीण व तिच्या पतीचा काहीसा विश्वास बसल्याने त्यांना कुठलाही संशय आला नाही. त्यातच, बाळ व मातेची प्रकृती ठणठणीत असल्याने दोघांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्याचे जिल्हा रूणालयातील परिचारिकांनी सांगितले. त्यानुसार बाळाचे वडील रुग्णालयात डिस्चार्ज व कागदपत्रांची पूर्तता करत होते. याचवेळी महिला बाळाच्या आईजवळ आली. बोलणे सुरु असतानाच संशयित महिलेने बाळंतीणीचे कपडे, साहित्य व बाळाला मी सांभाळते व परिसरात फिरवते, असे सांगितले. मातेचा तिच्यावर विश्वास असल्याने व तोंडओळखीने तिने बाळ महिलेकडे सोपविले. त्याचवेळी बाळाची आई आवरसावर करत असताना महिलेने बाळाच्या आईच्या विश्वासघात करुन काही क्षणांत बाळ चोरुन पळ काढला.
असा लागला छडा अन् काही तासातच बाळ आईच्या कुशीत
घटनेची माहिती कळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हेशाखा युनिट एकचे पथक दाखल झाले. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन बाळाचा व महिलेचा शोध सुरु केला होता. चोरी गेलेले बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात आईच्या कुशीत पोहोचले आहे. पोलिसांनी सपना मराठे (35, रा. धुळे) या महिलेला ताब्यात घेतले आहे.
0000