मुंबई : उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

उन्हाळी सुटीच्या दिवसांत गावाकडे जाण्यासाठी बस स्टँडवरील प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने यंदाही जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार अतिरिक्त बसच्या संगणकीय आरक्षणाला सुरुवात झाली असून मुंबई विभागात दिवसाला सरासरी ४४ हजार प्रवाशांची नोंदणी होत होती.

मात्र, गेल्या दोन दिवसांत हा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. त्यात १३ एप्रिल रोजी ४८ हजार, तर १४ एप्रिल रोजी ५० हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यात ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास, ६५ ते ७४ वय असणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाशांना ५० टक्के सवलत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलतीमुळे ही संख्या वाढल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *