उल्हासनगर : महानगरपालिकेच्या येणारी निवडणूक कायद्याने वागा लोकचळवळ शहरातील सर्व प्रभागांमधून लढवेल, अशी घोषणा कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी आयोजित केलेल्या ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमात केली.
उल्हासनगर पूर्वेकडील वाघमारे हाॅलमध्ये ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमाचं आयोजन कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर प्रमुख मार्गदर्शक होते. राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात मंगला मुजुमदार यांची प्रभाग क्रमांक १८ च्या अध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आली.
कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांनी काय्रक्रमाची प्रस्तावना मांडली. राकेश पद्माकर मीना यांनी ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. कावालो माध्यम समन्वयक प्रफुल केदारे संपूर्ण चर्चेचे सूत्रधार होते.
संदेश मुकणे, शशिकांत दायमा, संजय वाघमारे, ॲड. वनिता ओवळेकर, प्रा. सिंधु रामटेके, अनिल शर्मा, उमेश देबनाथ, मुकेश माखिजा, कुमार रेड्डीयार, अभिजीत मोंडल, अरिदीप जाना, प्रकाश भोसले, ललित कवात्रा, राहुल परब, शैलेंद्र रुपेकर अशा अनेकांनी वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपापली मतं व्यक्त केली. वालधुनी नदी, भ्रष्टाचार, प्रदुषण, प्रशासनिक अव्यवस्था, अनधिकृत बांधकामे, नियोजनशून्य विकास, अनारोग्य अशा विविधांगी मुद्यांवर चर्चा झाली.
राज असरोंडकर यांनी सांगितले की कायद्याने वागा लोकचळवळ शहरातील नागरिकांकडून शिफारशी मागवेल आणि त्यातून उमेदवारांची निवड व त्यांचं प्रशिक्षण करेल. हा खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
