आयएमपीटीटीए राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा

मुंबई : अष्टपैलू खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या किरण सालियनला अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सुरू असलेल्या आयएमपीटीटीए राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत तिहेरी जेतेपदाची संधी चालून आली आहे.
सांघिक गटात किरणसह समीर भाटे, तेजस नाईक आणि राजेश सिंगचा समावेश असलेल्या महाराष्ट्र अ संघाने अंतिम फेरीत धडक मारली असून जेतेपदाच्या लढतीत त्यांची गाठ त्यांच्याच ब संघाशी आहे.
पुरुषांच्या 49+ एकेरी वयोगटाच्या उपांत्य फेरीत, किरणने अव्वल मानांकित समीर भाटेवर 3-2 असा सहज विजय मिळवला. रवी चोप्राने चुरशीच्या लढतीत भूषण नेवगीला 3-2 असे हरवले. पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत किरणने समीर भाटेसह डॉ. नितीन तोष्णीवाल आणि आत्माराम गांगर्डे जोडीवर ३-० अशा फरकाने मात केली.
मिश्र दुहेरीच्या ४९+ सेमीफायनलमध्ये किरणने बिबियाना लोपेससह अविनाश कोठारी आणि मूनमून मुखर्जी यांच्यावर ३-० असा सहज विजय मिळवला. अन्य उपांत्य लढतींमध्ये नवीन सालियन आणि तृप्ती माचवे यांनी समीर भाटे आणि श्रावणी धापरे यांचा पराभव केला. किरणचा भन्नाट फॉर्म पाहता ४९+ वयोगटात त्याला तिहेरी मुकुटाची संधी आहे.
49+ वयोगटातील महिला सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत दोन्ही (अ आणि ब) संघ आमनेसामने असल्याने महाराष्ट्र संघाचे सुवर्णपदक निश्चित आहे. शिवप्रिया नाईक, श्रावणी धापरे, तृप्ती माचवे आणि सुषमा मोगरे अ संघाचे तर सादिया वंजारा, विनिता शुक्ला आणि प्रियांका घुमरे ब संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मूनमून मुखर्जी आणि सुषमा मोगरे यांनी अनुक्रमे शिवप्रिया नाईक आणि श्रावणी धापरे यांच्यावर विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केल्याने महिलांच्या 49+ एकेरी स्पर्धेत महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक मिळू शकते.
तथापि, 49+ महिला दुहेरी स्पर्धेत, राजस्थानच्या महिला सुशीला चौधरी आणि दिव्या गौतम यांनी उपांत्य फेरीत चांगला खेळ करताना श्रावणी धापरे आणि तृप्ती माचवे या सीडेड जोडीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर वैशाली मालवणकर आणि उज्वला चंद्रमोरे या महाराष्ट्राच्या जोडीचे आव्हान असेल.
पुरुषांची ५९+ सांघिक स्पर्धेची फायनल महाराष्ट्र अ आणि क संघांमध्ये खेळवली जाईल. पुरुष एकेरी 49+ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालच्या देबाशिष साहाने अव्वल मानांकित जोगेश मोटावानी याला पाच गेमच्या रोमांचक सामन्यात 3-2 असे पराभूत केले. अंतिम फेरीत त्याची गाठ महाराष्ट्राच्या प्रदीप गुप्ताशी पडेल.
उपांत्य फेरी अन्य निकाल:
महिला 59+ एकेरी : मंटू मुर्मू (पश्चिम बंगाल) विजयी वि. संध्या पटवा (राजस्थान) 3-0; कराबी मैती (पश्चिम बंगाल) विजयी वि. माधवी सावंत (महाराष्ट्र) 3-0 .
पुरुष ५९+ दुहेरी : अतुल देशमुख आणि जोगेश मोटवानी (महाराष्ट्र) विजयी वि. सुभमोय चॅटर्जी आणि पी.सी.शाह ३-२.
महिला ५९+ दुहेरी : मंटू मुर्मू आणि कराबी मैती (पश्चिम बंगाल) विजयी वि. निशा कापसे आणि माधवी सावंत (महाराष्ट्र); स्वाती आघारकर आणि मनीषा प्रधान विजयी वि. इसा सुकन्या आणि संध्या पटवा (तेलंगण) 3-0 असा पराभव केला.
मिश्र ५९+ दुहेरी : स्वाती आघारकर व पुरुषोत्तम मरकड विजयी वि. नूतन ढिकले व अशोक कळंबे ३-०; प्रशांत माचवे आणि जयश्री एन. विजयी वि. कपिल कुमार आणि मनीषा प्रधान 3-2.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *